पुणे – आरक्षणाबरोबरच मराठा समाजासाठी शैक्षणिक सवलतीत वाढ करण्याचा विषय शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी त्यांच्या कार्यकाळात विधिमंडळात सातत्याने मांडला. तसेच शिक्षण पूर्ण झालेल्या युवकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून देण्यासाठी महारोजगार मेळाव्याचेही त्यांनी यशस्वी आयोजन केले होते. यात त्यांनी ५३८ जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.
स्टार्ट अपमध्ये जास्तीतजास्त तरुणांनी उतरले पाहिजे आणि व्यवसायामध्ये स्वत:च्या पायांवर तरुणांनी उभे राहिले पाहिजे, ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी घेतली आहे. त्यांच्या भाषणातूनही त्यांनी याचा अनेकदा उल्लेख केला आहे. यासाठी अनेक सोयी-सवलतीही जाहीर केल्या आहेत. तरुणांना विविध माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणेही आवश्य असल्याने पुणे जिल्ह्यातील विविध उद्योजकांना घेऊन महारोजगार मेळाव्याचेही आयोजन त्यांनी केले होते.
यामध्ये मेळाव्यासाठी पुणे जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील ४० उद्योजकांनी पाच हजार ४१ रिक्तपदे कळवून, सहभाग दर्शविला. ३८ उद्योजक प्रत्यक्षात उपस्थित होते. मेळाव्यामध्ये ७९१ उमेदवारांनी सहभाग नोंदवला. त्यातून ५३८ उमेदवारांची निवड होऊन त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आली आणि शासनाच्या विविध महामंडळांकडे २५३ उमेदवारानी नाव नोंदवून स्वयंरोजगाराचा लाभ घेतला. यामध्ये शिवाजीनगर मतदारसंघाचे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सहकार्याने हा मेळावा यशस्वी झाला.