पुणे : घरातील दिव्यामुळे लागलेल्या आगीत सोसायटीत रहाणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना कोंढवा येथील एनआयबीएम रस्त्यावर रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणाची नोंद कोंढवा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार वृंदा संगवार (६५) यांचा मृत्यू झाला तर मनोज बोरकर (७५) हे जखमी झाले आहेत. कोंढवा खुर्द येथे शनश्री सुवर्ण युग सोसायटी आहे. तेथे रहाणारे विजय विनोद कलढोणकर(४४) यांच्या घरात देवाला दिवा लावण्यात आला होता. या दिव्याच्या वरतीच असलेल्या पडदयाला आग लागली. पडद्याला लगलेली ही आग वेगाने घरात पसरली आणि या आगीत एसीचा कॉम्प्रेसर फूटून मोठा स्फोट झाला.
स्फोटामुळे आग घरभर भडकली. यावेळी कलढोणकर यांची मेव्हणी वृंदा आणि दाजी मनोज हे दोघेच ज्येष्ठ नागरिक घरात होते. दोघेही वयोवृद्ध असल्याने त्यांना स्वतःचा बचाव करता आला नाही. ते घरातच अडकून पडले.
दरम्यान, काही वेळातच तेथे पोहोचलेल्या अग्निशमन दलाने चार वाहनांच्या मदतीने अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.