पुणे – ऍमनोरा शाळेने विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश द्यावा

विद्यार्थी, पालकांसह आमदारही उपोषणाला बसणार


शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आज आंदोलन

पुणे – हडपसर येथील ऍमनोरा शाळेने वाढीव फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकले असून या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत प्रवेश मिळावा व शाळेवर कारवाई व्हावी यासाठी विद्यार्थी, पालकांसह हडपसरचे आमदार योगेश टिळेकर शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर उद्या (सोमवार) उपोषणाला बसणार आहेत.

वाढीव शुल्क न भरल्यामुळे शाळेने मार्च मध्ये विद्यार्थ्यांची टीसी पोस्टाचेच घरपोच पाठविले होते. या विरोधात पालकांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. शाळेच्या प्रवेशद्वारासमोर पालक, विद्यार्थ्यांनी 13 दिवस ठिय्या आंदोलनही केले. त्याची दखल घेत शिक्षण विभागाने शाळा प्रशासन व पालक यांची संयुक्त बैठक घेऊन तोडगाही काढला होता. त्यानुसार 24 एप्रिलपासून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्याचा निर्णयही घोषित करण्यात आला होता. राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगानेही शाळेला आदेश दिले आहेत.

शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची शाळेकडून अंमलबजावणीच केली जात नाही. शाळेने अद्यापही विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेले नाहीत. त्यामुळे आता पुन्हा शाळेच्या अनागोंदी कारभाराविरोधात आवाज उठविण्यासाठी उपोषण आंदोलन करण्याचा निर्णय पालकांकडून घेण्यात आला आहे. आमदार योगेश टिळेकर यांनी आता या प्रकरणी लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी शिक्षण आयुक्त कार्यालयात निवेदनही सादर केले आहे. शाळेवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

शाळेत प्रवेश दिला जात नसल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्‍यात आले आहे. याची दखल शासनाने घेऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी पालकांच्या वतीने सोनल कोद्रे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.