विश्रांतवाडी – वडगावशेरी मतदारसंघातील पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा तसेच इतर वाहतूक संदर्भातील प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आमदार बापूसाहेब पठारे यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत पर्यायी रस्त्यांची पाहणी करीत सदर रस्त्यांची कामे वेगोन मार्गी लावण्याबाबत सूचना केली.
पुणे-नगर रस्त्याची वाहतूक कोंडी मार्गी लावण्यासाठी नदीपात्रालगतचा खराडी-शिवणे रस्ता महत्त्वाचा मानला लागतो. हा रस्ता भूसंपादनामुळे रखडला आहे. तसेच, पुणे विमानतळाचा रन-वे वाढवल्यामुळे ५०९ चौक ते लोहगाव हा एअर फोर्स हद्दीतील रस्ता बंद होण्याची शक्यता आहे. पर्यायी मार्ग म्हणून ५०९ चौक ते धानोरी जुना जकात नाका तसेच विमानतळ ते रामवाडी हे रस्ते होणे गरजेचे आहे.
दरम्यान, सदर रस्ते येत्या वर्षभरात पूर्ण करणार असल्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. आमदार पठारे यांनी अनेक वर्षे प्रलंबित राहिलेल्या खराडी-शिवणे रस्त्याच्या भूसंपादनाबाबत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. तसेच, प्रशासकीय मार्गाने तोडगा काढण्याबाबत सूचना केल्या.
यावेळी आमदार पठारे यांच्यासमवेत शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथविभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधिक्षक अभियंता साहेबराव दांडगे, कार्यकारी अभियंता संजय धारव, राजेश भुतकर, अजित सुर्वे, मकरंद वाडेकर आदी उपस्थित होते.
“लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांना सहन करावा लागणारा वाहतुकीचा गंभीर प्रश्न सोडवण्याकरिता सातत्याने विविध मध्यमातून व विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. पर्यायी मार्ग सुरू झाल्यास वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागेल आणि नागरिक बांधव यातून सुटकेचा नि:श्वास घेतील, ही खात्री आहे.” – बापूसाहेब पठारे, आमदार, वडगावशेरी मतदारसंघ