सिंहगडरस्ता – निवडणूक आयोग मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य, तसेच पुणे जिल्हाधिकारी यांनी निर्देशानुसार नवमतदार नोंदी तसेच दुरूस्ती आदींबाबतची मोहीम जारी केली आहे. त्यामुळे आपल्या भागातील, वॉर्डातील वाढीव तसेच नवमतदारांची नोंदणी करण्याची लगबग आजी-माजी नगरसेवकांसह, इच्छुक उमेदवारांनीही सुरू केली आहे.
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवमतदारांचा शोध नोंदणीसाठी घेतला जात आहे. आपल्या मतांमध्ये भर पडावी, यासाठी या माध्यमातून सर्वांचीच धडपड सुरू आहे. नवमतदार नोंदणी तसेच मतदार यादीतील दुरुस्ती आदी कामांसाठी ज्या-त्या परिसरातील इच्छुक उमेदवार पुढाकार घेत असल्याने प्रशासकीय कामावरील ताण काहीसा हलका झाला आहे. तसेच, ही मोहीम शंभर टक्के यशस्वी होणार, असेच चित्र दिसत आहे.
याच पार्श्वभूमीवर सिंहगड परिसरातील नवमतदारांची 18 ते 25 वयोगट नोंदणी व अगोदरच नोंदणी केलेल्या मतदारांची पडताळणी करण्यासह जागृतीसाठी विशेष प्रबोधन सभेचे आयोजन जिल्हा निवडणूक विभागातर्फे सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयात करण्यात आले होते. मंगळवारी (दि.16) मोहीमेच्या या दिवशी येथे नवमतदारांची नोंदीसाठी गर्दी दिसून आली.
दि. 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांसाठी नमुना 06 अर्ज भरणे, मयत व्यक्तीचे व इतर ठिकाणी स्थलांतर झालेल्या व्यक्तीचे नाव मतदार यादीतून वगळण्यासाठी नमुना 07 अर्ज भरणे तसेच नाव, फोटो, वय तपशील दुरुस्तीसाठी तसेच एका विधानसभा क्षेत्रातून दुसऱ्या विधानसभा क्षेत्रात स्थानिक करण्यासाठी नमुना 08 अर्ज भरावा लागत आहे. यासाठी योग्य पुराव्यांसह मतदान केंद्र निहाय अर्ज सादर करावे लागत आहेत.
दरम्यान, मतदार यादी संक्षिप्त पुनर्निरिक्षण कार्यक्रम दि. 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2019 या कालावधीत राबविण्यात येत आहे.यावेळी सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संजीव ओहोळ उपस्थित होते. सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाचे उपअधीक्षक राजेंद्र काळे यांनी आभार मानले.
सदर कामकाज सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहे. मतदारांसाठी ऑनलाइन नोंदणी व स्थानांतरण यासाठी आयोगाच्या या र्पीीं.ि खप. लशे.ारहरीरीहीींर.ळप संकेतस्थळाचा वापर करावा. याबाबत नवमतदार आणि मतदारांना आवाहन करीत आहे.
– रंजना उंबरहंडे, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी