पुणे: पुणे पालखी महामार्ग भूमीपूजन प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठी घोषणा केली आहे. पुणे विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं नाव देण्यात येणार आहे, असे फडणवीस यांनी म्हंटले आहे. पुण्याचे खासदार केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यासंबंधी सरकारला प्रस्ताव दिला होता, तो आम्ही स्वीकारला आहे, येत्या कॅबिनेटमध्ये या प्रस्तावाला मंजुरी मिळेल, असे फडणवीसांनी म्हटले.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नवीन विमानतळ तयार करण्यात येणार असून त्याला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्यायचं आहे. पंरतु पुण्यात जे विमानतळ आहे, जे नव्या पद्धतीने बनवण्यात आलंय त्याचं नामकरण जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या नावाने व्हावे, अशी संकल्पना खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मांडली होती. त्यावर तात्काळ काम आम्ही सुरू केले आहे.
येत्या कॅबिनेटला आम्ही तो प्रस्ताव मांडून मंजूर करून घेणार आहोत. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार आहोत. त्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करून घेण्याची जबाबदारी मुरलीधर मोहोळ आणि नितीन गडकरी यांची असणार आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांचं नाव विमानतळाला दिलं तर त्याचा सगळ्यांना आनंद होईल, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.