पुणे, [प्रभात वृत्तसेवा} – पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे नाव देण्यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव तयार करुन केंद्र सरकारकडे पाठवावा, अशी भूमिका खासदार आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मांडली आहे.
त्यासंदर्भात मोहोळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
विमानतळाचे नामकरण करतानाचा नावाचा प्रस्ताव हा राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे येत असतो आणि त्यानंतर नामांतरावर शिक्कामोर्तब होते. म्हणूनच पुण्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने राज्य सरकारकडे ही भूमिका मांडली आहे, असे मोहोळ यांनी सांगितले.
आपल्या भूमिकेवर राज्य सरकारही सकारात्मक असून लवकरच हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. त्यानंतर केंद्र सरकारकडे आपण याचा पाठपुरावा करणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
पुण्याचे विमानतळ असलेल्या लोहगावमध्ये जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांचे आजोळ होते. त्यामुळे लोहगाव आणि तुकाराम महाराजांचे नाते जिव्हाळ्याचे होते. शिवाय लोहगावच्या गावकऱ्यांचीही माझ्याच भूमिकेप्रमाणे इच्छा असून महाराष्ट्रातील तमाम वारकरी सांप्रदायाचीही संवेदना या विषयाशी जोडलेली आहे.
त्यामुळे लोहगावच्या विमानतळाला तुकोबारायांचे नाव देणे, हे अधिक समर्पक असणार आहे, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.