पुणे – देहू येथून संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या दि. १९ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत. या सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होतात. या गर्दीची सुरक्षितता तसेच नियोजन हे प्रशासनासमोर मोठे आव्हान असते.
यापार्श्वभूमीवर पुणे शहरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. वारकऱ्यांची नेमकी संख्या, दिंड्यांसोबत असलेली वाहने यांची माहिती एआयच्या सहाय्याने नोंदवली जाणार आहे, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
पुण्यात विश्रांतवाडी येथून पालखी सोहळ्याने प्रवेश केल्यानंतर विश्रांतवाडीसह, शिवाजीनगरमधील संचेती चौक, गुडलक चौक (फर्ग्युसन रस्ता), भैरवनाथ मंदिर, गाडीतळ आणि दिवेघाट या ठिकाणी एआय कॅमेऱ्यांच्या मदतीने वारकऱ्यांची संख्या मोजली जाणार आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी येणारे भाविक आणि दर्शन घेऊन गेलेल्यांची संख्याही पोलिसांना एआयमधून मिळणार आहे.
गर्दीचे व्यवस्थापन, गुन्हेगारीवर नियंत्रण, वाहतूक नियोजन यासाठी एआय उपयोगी पडणार असल्याचे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले. दरवर्षी, दोन्ही पालख्या सोहळ्यात एकुण सुमारे ९ ते १० लाख लोक सहभागी होतात आणि सुमारे १५०० ट्रक वारीसोबत जातात. याची सर्व माहिती यावर्षी एआयच्या सहाय्याने मिळणार आहे. यासाठी दोन वाहने कॅमेरा, फेस रिडिंग, रडार आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असणार आहेत.
दिवेघाटात ब्लास्टिंगमुळे अडचण…
पुण्यातील पालखी मार्गाची पोलीस आयुक्तांनी पाहणी केली आहे. विश्रांतवाडी चौक येथे अंडरग्राउंड रस्त्याचे काम सुरू असल्याने तेथे तीन स्तरावर बॅरिकेड्स लावले जाणार आहेत. भेकराईनगर ते वडकी नाला दरम्यान, पालखीच्या आधीच दिंड्यांच्या गाड्या सासवडच्या दिशेने वळवण्याचा निर्णय घेतला आहे. वडकी नाला ते दिवेघाट दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण सुरू असून कामाचे साहित्य अस्ताव्यस्त आहे, त्यामुळे योग्य ते नियोजन करण्यात येणार आहे.
गाडीतळ ते भैरोबानाला आणि दिवेघाट परिसरात गर्दी नियंत्रणासाठी उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. दिवेघाटात सध्या ब्लास्टिंगमुळे डोंगरातील माती व दगड सुटे झाले असून ती जागा धोकादायक असल्याने तेथे प्रवेश निषिद्ध करण्यात येणार आहे. पालखी मार्गावरील पावसाळ्यात चिखल होणारी ठिकाणे, खड्डे, पाणी साचणारे भाग, अपूर्ण पूल व अडथळ्यांची यादी तयार करून १०० पेक्षा अधिक कामांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.