पुणे – मार्केट यार्डातील भुसार विभागातील तोलणारांना कामावर रूजू करून घेण्याचे आदेश पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी व्यापाऱ्यांना दिले.
भुसार विभागातील व्यापाऱ्यांनी तोलणारांचे काम बंद केले होते. त्यांना कामावर रूजू करून घेण्याबाबत बैठकाही झाल्या होत्या. मात्र, त्यावर तोडगा निघत नव्हता. याबाबत पुन्हा प्रशासक गरड यांच्या उपस्थितीत हमाल संघटना आणि दि पुना मर्चंटस् चेंबरच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
यावेळी हमाल पंचायतचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, दि पुना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल,
निमंत्रक नितीन पवार, सरचिटणीस गोरख मेंगडे, कामगार संघटनेचे संतोष नांगरे, किशोर भानुसघरे, सहसचिव हनुमंत बहिरट, खजिनदार चंद्रकांत मानकर आदी उपस्थित होते.
हमाल पंचायत, राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या शिष्टमंडळाने नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच पणन संचालक सतीश सोनी यांची भेट घेतली.
भुसार विभागातील तोलणारांच्या संदर्भात उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाबाबत 15 ऑक्टोंबर रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयातील अर्जाची बाजार समिती प्रशासकांना आठवण करून दिली. मात्र, त्यांनी तोलणारांना कामावर रूजू करून घेण्याचे आदेश दिले आहेत.
– पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष, दि पुना मर्चंटस् चेंबर