पुणे – परवडणारी घरे घेणाऱ्यांना दिलासा

ग्रामपंचायत हद्दीतील मुद्रांक शुल्काचा एक टक्‍का कर कमी : राज्य शासनाकडून निर्णय

पुणे – जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत पंतप्रधान आवास योजनेतील 30 आणि 60 चौरस मीटरच्या घरांच्या दस्त नोंदणीवर आकारण्यात येणाऱ्या जिल्हा परिषदेचा मुद्रांक शुल्काचा एक टक्‍का कर कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे परवडणारी घरे घेणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्य सरकारकडून जकात रद्द करण्यात आला आहे. त्यापोटी महापालिकांना मिळणारे उत्पन्नात मोठी कपात झाली. ती भरून काढण्यासाठी राज्य सरकारकडून दस्तनोंदणींवर एक टक्‍का एलबीटीची आकारणी सुरू केली होती. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात दस्त नोंदणी करताना त्यावर एक टक्‍का एलबीटीची आकारणी केली जाते. तर, जिल्हा परिषदेच्या हद्दीत म्हणजे जिल्ह्याच्या हद्दीत आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत जिल्हा परिषदेचा एक टक्‍का कर दस्त नोंदणीवर आकारला जातो. त्याचा परिणाम घरांच्या किंमती वाढण्यावर झाला. असे असतानाच 8 फेब्रुवारीपासून राज्य सरकारने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो प्रकल्पासाठी दस्तनोंदणीवर एक टक्‍का अतिरीक्त अधिभार आकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात दस्त नोंदणी करताना सहा ऐवजी सात टक्‍के मुद्रांक शुल्क भरावे लागत आहे. त्यामुळे सर्वसाधारण घरांची नोंदणी करताना शहरांच्या हद्दीत सात टक्‍के, तर पीएमआरडीएच्या हद्दीत पाच टक्‍के मुद्रांक शुल्क भरावे लागते. दोन्ही हद्दीत परवडणाऱ्या घरांची दस्त नोंदणी करताना त्यावरील मुद्रांक शुल्क केवळ 1 हजार रुपये करण्यात आले.

एक हजार रुपयांमध्ये होणार दस्तनोंदणी
राज्य सरकारच्या ग्राम विकास विभागाने जिल्हा परिषदांच्या हद्दीत ज्या घरांना मुद्रांक शुल्क माफ करण्यात आला आहे. अशा घरांच्या दस्तनोंदणीवर आकारण्यात येणाऱ्या एक टक्‍का जिल्हा परिषदेचा अतिरीक्त कर देखील रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पीएमआरडीए आणि जिल्ह्यातील हद्दीत पंतप्रधान आवास योजनेतील 30 आणि 60 चौरस मीटरच्या घरांच्या दस्तनोंदणी करताना आतापर्यंत एक हजार रुपये मुद्रांक शुल्क आणि एक टक्‍का एलबीटी आकारला जात होता. तो आता रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ एक हजार रुपयांमध्ये घरांची दस्तनोंदणी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.