पुणे – महापालिकेकडून शहरातील अधिकृत तसेच नव्या जाहिरात फलकांना (होर्डिंग्ज) तीन महिन्यांचीच मुदतवाढ देण्यात येणार आहे. महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाकडून काही जाहिरात फलकांना 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2019 पर्यंत दोन वर्षांची मुदतवाढ दिली होती. त्याच धर्तीवर 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2021 पर्यंतचा प्रस्ताव प्रशासनाकडून मुदतवाढीसाठी आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवला होता. मात्र, त्यांनी 30 जून 2019 पर्यंतच मुदतवाढ देण्यास मान्यता दिली आहे.
आकाशचिन्ह आणि परवाना विभागाच्या 2003 च्या नियमावलीनुसार, होर्डिंग्जला परवानगी दिली जाते. त्यातच, महापालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या जाहिरात शुल्काविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाची अडचण झाली असून न्यायालयाच्या निर्णयानुसार, शुल्क आकारणीकरून महापालिकेस परवानगी द्यावी लागणार आहे. त्यामुळे आयुक्तांनी दोन वर्षांची मुदतवाढ न देता न्यायालयाच्या निर्णयाच्या आधीन राहून तात्पुरत्या स्वरुपात 3 महिन्यांसाठी होर्डिंग्जला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात होर्डिंग्जधारकांकडून हमी पत्र घेऊन या मान्यता दिल्या जाणार आहेत. शहरात महापालिकेची मान्यता असलेली 1,882 होर्डिंग्ज अधिकृत आहेत.