पुणे- नियोजित वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रवेश डिसेंबरपासून सुरू करणार असल्याचा दावा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे. या महाविद्यालयाचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मोहोळ यांनी दिली. “नॅशनल मेडिकल कमिशन’ यांच्या सूचनांनुसारच हे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
महापालिकेतर्फे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी बाबुराव सणस शाळा आणि कमला नेहरू रुग्णालयामध्ये सर्व यंत्रणा उभारण्यात येत आहे. महाविद्यालय सुरू करण्यासाठी केंद्राकडे महापालिकेने प्रस्तावही पाठवला आहे. त्यानुसार केंद्राच्या “नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी)च्या टीमने मागील महिन्यात अचानक येऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांनी पदभरती आणि मूलभूत सुविधांविषयी सूचना केल्या. तसेच, ही प्रक्रिया एक महिन्यात पूर्ण करण्यासंदर्भातही सूचना केल्या. त्यानंतर हे काम युद्धपातळीवर सुरू झाले असून, 48 प्राध्यापकांची नियुक्ती केली आहे. याशिवाय, अन्य विभागातील जादा स्टाफ या ठिकाणी प्रतिनियुक्तीवर घेण्यात आला असून, ती संख्या 41 आहे. याशिवाय अन्य स्टाफचीही भरती करण्यात येणार आहे.
मूलभूत सुविधांमध्ये विद्युतविषयक कामे म्हणजे सीसीटीव्ही वगैरेची कामे झाली आहेत. याशिवाय ओपीडी वाढवल्या आहेत. त्यासंदर्भातील फलक लावले आहेत, वैद्यकीय विभाग वाढवले आहे. याठिकाणी लागणारी मशिनरी, साहित्य आले आहे. बांधकाम आणि अन्य कामे झाल्यानंतर त्याचे “इन्स्टॉलेशन’ करण्यात येणार आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांना साकडे
या महाविद्यालयाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, याला परवानगी देण्यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांना साकडे घातले आहे. त्यांची भेट घेऊन त्यांना या महाविद्यालयाच्या परवानगीबाबत विनंती केल्याचे, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
प्रवेश प्रक्रिया पुढील वर्षी जूनमध्येच
सगळ्या परवानग्या मिळाल्यानंतर डिसेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू करू, असे महापौरांनी सांगितले आहे. मात्र, वैद्यकीय महाविद्यालयाचे शैक्षणिक वर्ष डिसेंबरपासून नाही, त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया डिसेंबरमध्ये होणे शक्य नाही. त्यामुळे ती पुढील वर्षी जूनमध्येच होणार असल्याचे प्राथमिक स्तरावरून दिसून येते.