पुणे- राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावरून जिल्हा परिषदांचे गट आणि पंचायत समिती यांचे गण यांची जिल्हा प्रशासनाने केलेली प्रारूप रचना रद्द करण्यात आली आहे. तर, 20 मार्च रोजी जिल्हा परिषद सदस्यांची मुदत संपल्यामुळे दि.21 पासून पुणे जिल्हा परिषदेवर “प्रशासकराज’ असणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत.
निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समित्यांच्या गणरचनांचे सादर केलेले प्रारूप रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारच्या आदेशावरून गट आणि गण यांची रचना आणि आराखडे तयार केले जातील.
राज्य निवडणूक आयोगाचे आराखडे तयार करून ते मंजूर करण्याचे अधिकार संपुष्टात आल्यानंतर आता संपूर्ण गट आणि गण रचना नव्याने केली जाणार आहे. याबद्दलच्या सूचना राज्य सरकारच्या ग्रामीण विकास विभागाकडून दिल्या जातील.
दरम्यान, 14 मार्चपासून जिल्ह्यातील पंचायत समितीवर प्रशासक म्हणून गटविकास अधिकाऱ्यांकडे सूत्र देण्यात आली. आता पुणे जिल्हा परिषद सदस्यांची मुदत संपल्यामुळे आजपासून जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासक पाहणार आहेत. प्रशासक म्हणून गटविकास अधिकाऱ्यांकडे पंचायत समित्यांची सूत्रे ताब्यात गेली.