पुणे – वनविभागातर्फे शुक्रवारी (दि.29) महंमदवाडी परिसरातील 20 गुंठे जमिनीवर करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्यात आले. या जमिनीची किंमत सुमारे 10 कोटी असल्याचे सांगितले जात असून, याप्रकरणी अतिक्रमण धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.
महंमदवाडी येथील सर्वे नंबर 41 चे क्षेत्र 1 मार्च 1879 अन्वये राखीव वन म्हणून घोषीत झाले होते. हे क्षेत्र महसूल विभागाच्या ताब्यात होते. त्यानंतर 2009 साली वनविभागाने ही जागा ताब्यात घेतली. नुकतेच त्याठिकाणी क्षेत्रावर अतिक्रमण झाल्याचे वनविभागाच्या निदर्शनास असल्याने विभागाकडून संबंधित अतिक्रमण निष्कासित करण्यात आले. त्याचबरोबर स.नं. 45 येथील 3 गुंठे अनाधिकृत बांधकामावर कारवाई केली. संबंधित अतिक्रमणधारकांवर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 अन्वये गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही सुरू आहे.
ही कारवाई पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे, वनपरीक्षेत्र अधिकारी मुकेश सणस, प्रदीप संकपाळ, वनपाल समीर इंगळे, वनरक्षक मनोज पारखे यांनी केली.
300 पेक्षा अधिक झोपड्या, पत्राशेड हटवले
हडपसर,-औद्योगिक वसाहती मागील मुठा कालव्यालगत दोन्हीही बाजूने नव्याने होत असलेल्या व काही महिन्यांपूर्वी झालेल्या अतिक्रमणांवर पाटबंधारे विभाग व महापालिकेने संयुक्तपणे कारवाई सुरू केली.
यात 300 पेक्षा अधिक झोपड्या, पत्राशेड हटवले. येथील पाटबंधारे विभागाच्या मोकळ्या जागेत ही अतिक्रमणे झाली आहेत. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई सुरू झाली. मागील महिन्यांतही येथे कारवाई केली होती. मात्र, पुन्हा याठिकाणी नव्याने झोपड्या बांधल्या गेल्या. खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, दिगंबर शिंदे, राजू अडागळे यांच्या नेतृत्वाखाली तीनही विभागांतील कर्मचारी सहभागी झाले होते.
कालव्याच्या एका बाजूला असलेल्या सव्वादोनशे तर दुसऱ्या बाजूला असलेल्या दीडशे झोपड्या हटवल्या. यात काही पक्क्या स्वरूपातील एक व दोन मजली घरेही होती. या कारवाईसाठी विद्युत वितरण कंपनीचे 20 कर्मचारी, महापालिकेचे 60 कर्मचारी, पाटबंधारे विभागाचे 55 कर्मचारी, 10 जेसीबी, 10 हायवा टिप्पर तसेच 180 पोलीस होते. तसेच दोन अग्निशमन बंब, दोन जेसीबी यांच्या मदतीने ही कारवाई केली. कारवाई करण्यात येत असतानाच पाठीमागे लगेचच जागेला कुंपण घालण्याचे कामही करण्यात आले.
– पोपटराव शेलार, उपअभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग