पुणे – अतिरिक्‍त आयुक्‍त मारहाण प्रकरण : वादावर तोडगा काढण्यासाठी आज बैठक

पुणे – अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकारानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मुख्यसभा, स्थायी समिती तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या बैठकांना न बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सभांवर त्याचा परिणाम होण्याची शक्‍यता असल्याने या वादावर तोडगा काढण्यासाठी महापौर मुक्‍ता टिळक यांनी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलाविली आहे. यात तोडगा निघण्याची शक्‍यता आहे.

जलपर्णीच्या कामावरून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी सोमवारी महापालिकेत आंदोलन केले होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना धक्‍काबुक्‍की तसेच शिवीगाळ झाली होती. या प्रकरणाचे तीव्र पडसाद अधिकाऱ्यांमध्ये उमटले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ महापालिका अभियंता संघ आणि कामगार संघटनांनी मंगळवारी काम बंद आंदोलन पुकारत जोपर्यंत पदाधिकारी आणि अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसाठी कामाची आदर्श आचारसंहिता केली जात नाही, तो पर्यंत पदाधिकाऱ्यांच्या बैठकांना उपस्थित न राहण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे बुधवारी झालेल्या शहर सुधारणा समिती तसेच क्रीडा समितीच्या बैठकींना कोणीही अधिकारी उपस्थित नसल्याने या सभांचे तात्पुरते कामकाज करून तहकूब करण्यात आल्या. तर पुढील आठवड्यात महापालिकेचे अंदाजपत्रक असल्याने तसेच हा वाद न मिटल्यास स्थायी समितीच्या बैठकाही रखडण्याची शक्‍यता असल्याने या वादावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी दुपारी 4 वाजता ही बैठक बोलाविली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्थायी समितीची अडचण
महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष पुढील आठवड्यात अंदाजपत्रक सादर करणार आहेत. त्यातच, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे समितीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रस्ताव मान्यतेसाठी येत आहेत. मात्र, मंगळवारी समितीची सभा या प्रकरणामुळे तहकूब करून गुरुवारी बोलाविली आहे. मात्र, अधिकाऱ्यांचा बहिष्कार कायम असल्याने सभा तहकूब झाल्यास स्थायी समितीची चांगलीच अडचण होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)