कोंढवा (महादेव जाधव) – शहर तसेच उपनगर परिसरात मिळेल त्या जागेसह शाळा-महाविद्यालय परिसरात महापालिकेच्या आकाश विभागाची परवानगी न घेताच, कर न भरताच फ्लेक्स लावणाऱ्या स्वयंघोषित राजकीय नेते, भाई, दादांसह त्या फ्लेक्सवर झळकणाऱ्या प्रत्येक छायाचित्रातील व्यक्तीवर कायदेशीर तसेच दंडात्मक कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस यंत्रणेकडून ठेवण्यात येत असून महापालिका प्रशासन तसेच पोलिसांकडून सदर कारवाई संयुक्तपणे करणार असल्याचे सांगितले जात आहे. फ्लेक्सच्या समोर किंवा शेजारी फ्लेक्स लावला या कारणावरूनही भांडण होऊ लागल्याने राजकीय फ्लेक्सवर कायमची बंदी घालण्याबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे.
राजकारणी, स्वयंघोषित नेते व व्यक्ती स्वतःच पैसे खर्च करून कार्यकर्ते व शाळा, महाविद्यालयीन तरुणांचे फोटो छापून स्वत:लाच शुभेच्छा देणारे फ्लेक्स चौका-चौकात, बाजार, मार्केट, मुख्यरस्ते, विजेचे खांब, शाळा-महाविद्यालयाच्या परिसरात झळकवत आहेत. या फ्लेक्सबाजीमुळे परिसराचे विद्रुपीकरण होत असून यातून गट-तट निर्माण होऊन तेढ वाढत आहे. पालिका प्रशासनाने अशी फ्लेक्सबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी करणे गरजेचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
पूर्व हवेली तालुक्यातील कोंढवा, येवलेवाडी, पिसोळी, उंड्री, हांडेवाडी, मंतरवाडी, उरुळी देवाची, भेकराईनगर,फुरसुंगी व उपनगरांमध्ये अंतर्गत रस्त्यांसह प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये मोठमोठे फ्लेक्स लावल्यामुळे वाहनचालकांचे लक्षही विचलित होत आहे. तुझा फोटो त्याच्या फ्लेक्सवर कसा… या वृत्तीतून अगदी लाठ्याकाठ्यांनीही हाणामारी होत आहे. अनेकजण स्वयंघोषित दादा, भाऊ, भाई व भावी नेते झाल्याने शाळा-महाविद्यालयाचे वातावरण दूषित होत आहे.
काही जणांचा होतो केवळ “वापर’
धनदांडगे, स्वयंघोषित नेते, राजकारणी स्वतःला “प्रमोट’ करण्यासाठी आपला वाढदिवस साजरा करतात, त्यानिमित्त झळकणाऱ्या फ्लेक्सवर काही मुलांचे फोटो छापले जातात. त्या फोटोखाली नाव नसते, त्यामुळे अशा फोटोंना काहीच अर्थ राहत नाही. अशांना कोणी ओळखतही नाही. यातून केवळ जो पुरस्कृत नेता असतो त्याची स्वत:चीच प्रसिद्धी होते. अन्य फोटो असलेल्यांचा केवळ फ्लेक्स भरण्यासाठी “वापर’ होतो. मात्र, फ्लेक्स लावणाऱ्याची ही “स्टॅटर्जी’ अनेकांना कळत नाही.