पुणे – मोठमोठे होर्डिंग्ज, बोर्ड, बॅनर्स, फ्लेक्स यांच्यावरील गेल्या दीड वर्षांपासून थंडावलेली कारवाई पुन्हा सुरू करण्यात आली आहे. गेल्या 25 दिवसांत 10 हजारांपेक्षा जास्त अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्सवर महापालिकेच्या “परवाना आणि आकाशचिन्ह विभागा’ने कारवाई केली आहे. यामध्ये सुमारे 51 मोठ्या होर्डिंग्जवर कारवाईचा समावेश आहे.
शहरात जुन्या बाजाराजवळील शाहीर अमर शेख चौकात होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेनंतर आणि झालेल्या जीवितहानीमुळे महापालिकेने अनधिकृत होर्डिंग्ज आणि अन्य गोष्टींवर कारवाई केली होती. मात्र, त्यानंतर करोनाचा प्रादुर्भाव आणि आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मनुष्यबळ नसल्याचे कारण देत महापालिकेने ही कारवाई करणे टाळले होते. मात्र, ऑगस्टपासून या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.
यामध्ये होर्डिंग्ज, बॅनर याशिवाय बोर्ड, फ्लेक्स, पोस्टर्स, किऑक्स आणि अन्य गोष्टींचा समावेश आहे. गेल्या 25 दिवसांच्या कारवाईत एकही गुन्हा दाखल झाला नाही. ही कारवाई पाच परिमंडळांतर्गत येणाऱ्या 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत करण्यात येत आहे.
एकूण 51 होर्डिंग्ज, 2 हजार 113 बोर्ड, 1 हजार 626 बॅनर्स, 1 हजार 554 फ्लेक्स, 216 झेंडे, 2 हजार 914 पोस्टर्स, 1 हजार 336 किऑस आणि इतर 988 अशा 10 हजार 798 अनधिकृत गोष्टी महापालिकेने कारवाई करून काढून टाकल्या आहेत.
शहर विद्रूपीकरणात हे होर्डिंग्ज, बॅनर्स, झेंडे यांचा वाटा मोठा आहे. अनेकजण रात्रीतूनच हे होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स लावतात. त्याची महापालिकेच्या परवाना आणि आकाशचिन्ह विभागाकडून रितसर परवानगी घेणे बंधनकारक असताना ती घेतली जात नाही. याशिवाय होर्डिंग्जच्या विषयातही हाच प्रश्न आहे. त्यामुळे महापालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे.
आपत्कालीन परिस्थितीमुळे होर्डिंग्जचे परवाने नूतनीकरण झाले नाहीत. ते करून देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, यामध्ये ज्यांची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत, त्यांचा समावेश नाही. समाविष्ट गावांतील यावरील सगळ्या गोष्टींच्या नूतनीकरण आणि परवानगीसाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. त्या मुदतीत त्यांनी नोंदणी आणि नूतनीकरण करून घेणे आवश्यक आहे. – डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका