पुणे – फर्गसन महाविद्यालय रस्त्यावरील हॉटेल वैशालीच्या टेरेस, सामासिक अंतर (साइड मार्जिन) यातील अतिक्रमणांवर महापालिकेच्या कारवाईचा बुलडोझर फिरला. यापूर्वी पालिकेने 2015 मध्ये हा अतिक्रमणांवर कारवाई केली होती. त्यानंतर प्रत्येक वेळी “हॉटेलवर न्यायालयाचा स्टे आहे,’ असे सांगून कारवाई टाळली जात होती.
महापालिकेने या हॉटेलच्या कागदपत्रे तपासणी तसेच सर्व माहिती घेतली. दरम्यान, या हॉटेलच्या मालकी वाद सुरू असून अनधिकृत बांधकाम कारवाईचा त्याच्याशी काहीच संबंध नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पालिकेने बुधवारी फौजफाट्यासह या हॉटेलवर कारवाई केली.
याबाबत कार्यकारी अभियंता सुनील कदम यांनी दिली. सोबतच क्विन्स शॉप स्टोरी या दुकानाचेही अनधिकृत बांधकामही काढण्यात आले. या दोन्ही कारवाईत सुमारे 3,500 चौरस फुट अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. यामध्ये बांबू, पत्रा, लोखंडी अँगल, ओनिंगद्वारे बांधलेले शेड ई. चा समावेश आहे. वैशाली हॉटेलमधील सर्व विनापरवाना शेड काढण्यात आल्या.
तसेच पथक मागे फिरताच हलवता येणारे ओनिंग शेडही कापून काढण्यात आले. कार्यकारी अभियंता बिपिन शिंदे, सुनील कदम, शाखा अभियंता राहुल रसाळे, कनिष्ठ अभियंता समीर गढई यांनी एक गॅस कटर घरपाडी विभागाकडील 10 बिगारी, एक पोलीस गट यांच्या सहायाने कारवाई करण्यात आली. पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे कदम यांनी सांगितले.