पुण्याचे एसीपी दीपक हुंबरेंवर खंडणीप्रकरणी भुईंजमध्ये गुन्हा

सातारा/कवठे (प्रतिनिधी) – वाई शहरातील गोळीबार प्रकरणातील भुईंज येथील संशयिताकडून 40 हजार रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी वाईचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक व पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक हुंबरे यांच्यावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनने पुणे व सातारा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शुभम मनोज पवार (रा. भुईंज) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी, वाई येथे पोलीस उपअधीक्षकपदावर काम केलेल्या दीपक हुंबरे सध्या पुणे पोलीस दलात सहाय्यक पोलीस आयुक्‍तपदावर कार्यरत आहे. त्यांना पुणे पोलीस आयुक्तांनी सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. सध्या रिकामा वेळ असल्याने हुंबरे हे दि. 17 रोजी भुईंज येथे आले होते. ते भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्‍याम बुवा यांच्या दालनात गेले होते. त्यावेळी वाईतील गोळीबार प्रकरणातील एका संशयिताच्या मित्राला चौकशीसाठी भुईंज पोलीस ठाण्या बोलवण्यात आले होते.

बुवा यांच्या दालनातून बाहेर आल्यावर हुंबरे यांनी गोळीबार प्रकरणातील संशयिताच्या मित्रांना फोन करून भुईंज बसस्थानकाजवळ बोलावून घेतले आणि मी बुवा यांच्याशी बोललो आहे, तुम्हाला काही त्रास होणार नाही, असे म्हणून हुंबरे यांनी त्यांच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर हुंबरे जोशीविहीर येथे निघून गेले. त्यानंतर शुभम पवार व त्याच्या मित्राने घरातून प्रत्येकी वीस हजार रुपये घेऊन हुंबरे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यावर जोशीविहीरला या, असे हुंबरे यांनी सांगितले. शुभम व त्याच्या मित्राने जोशीविहीर येथे जाऊन हुंबरे यांना 40 हजार रुपये दिले. त्यानंतर हुंबरे पुण्याला गेले. मात्र, हुंबरे यांना पैसे दिल्यानंतरही चौकशीला बोलवण्यात आल्याने आपली फसवणूक झाल्याचे शुभमच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने हा प्रकार सपोनि श्‍याम बुवा यांच्या कानावर घातला. बुवा यांनी याबाबत वरिष्ठांना तातडीने अहवाल सादर केल्यानंतर हुंबरे यांना साताऱ्यात बोलावण्यात आले होते. सातारचे अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्यासमोर हुंबरेंची चौकशी झाल्यानंतर सोमवारी (दि. 25) खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सक्तीच्या रजेवर असूनही गणवेश घालून साताऱ्यात
दीपक हुंबरे यांचे पुण्यातील अनेक कारनामे उजेडात आल्यानंतर पोलीस आयुक्तांनी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले, तरीही ते सरकारी गणवेश घालून भुईंजला कशासाठी आला होता? लॉकडाऊनमध्ये जिल्ह्याबाहेरील लोकांना परवानगीशिवाय जिल्ह्यात येणे शक्‍य नसताना हुंबरेंना परवानगी कोणी दिली? ते श्‍याम बुवा यांनाच का भेटायला गेले होते, असे अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत.
ड्रग प्रकरणाशीही कनेक्‍शन?
हुंबरे हे चार वर्षांपूर्वी वाईचे पोलीस उपअधीक्षक होते. त्यानंतर त्यांची बदली पुण्यात सहाय्यक पोलीस आयुक्तपदी झाली. वाई उपविभागात कार्यरत असतानाच हुंबरे यांचे नाव मुंबईतील ड्रगमाफिया बेबी पाटणकरच्या प्रकरणाशी जोडले गेले होते. त्याच प्रकरणात लाच घेताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.