पुणे – बोपदेव घाटात तरुणीवर सामुहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीने स्वतःचे व फरार आरोपीचे नाव खोटे सांगितल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी शोएब उर्फ अख्तर बाबू शेख याच्या वडिलांचे नाव जमाल लखपती असे असून त्याने खोटे नाव सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
तसेच त्याने फरार साथीदाराचे नाव बाप्या उर्फ सोमनाथ यादव असे असल्याचे खोटे सांगितले असून त्याचे मूळ नाव बाप्या उर्फ सूरज दशरथ गोसावी असे असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी शोएब उर्फ अख्तर बाबू शेख (वय २७, रा. आदर्शनगर, मंतरवाडी, उरुळी देवाची) आणि चंद्रकुमार रविप्रसाद कनोजिया (वय २०, रा. होलेवस्ती, उंड्री) यांना पोलिसांनी सोमवारी (दि.५) रात्री ताब्यात घेतले. वानवडी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. कुलकर्णी यांच्या न्यायालयात मंगळवारी (दि.६) या दोन्ही आरोपींना हजर केले.
त्यावेळी आरोपींनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. या गुन्ह्याचा तपास संवेदनशील व विस्तृत स्वरुपाचा असल्याने, आरोपींची पोलीस कोठडीत चौकशी गरजेची आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील डॉ. आम्रपाली कस्तुरे यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपींना आठ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पोलीस जाणार अख्तर शेखच्या गावी…
अख्तर शेखचे आधार कार्ड व जन्म दाखल्याची खातरजमा करण्यासाठी पोलीस त्याला घेऊन त्याचे मूळगाव लातूर आणि नागपूर येथे जाणार आहेत, तसेच त्याला फरार आरोपी बाप्या उर्फ सूरज गोसावीचा ठावठिकाणा माहिती असल्याने चौकशी करणार आहेत.
याशिवाय तिघे आरोपी गुन्हा करण्यापूर्वी कोठून आले होते, तसेच गुन्हा केल्यानंतर कुठे कुठे गेले, तेथे अख्तर शेख आणि चंद्रकुमार कनोजिया यांना समक्ष नेऊन तेथील साक्षीदारांकडे तपास केला जाणार आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
आरोपींनी असे गुन्हे केलेत का?
दोन्ही आरोपींची एकत्रित चौकशी करून त्यांनी हा गुन्हा कशा प्रकारे केला आहे, याचा तपास करायचा आहे, तसेच आरोपींनी पुण्याच्या ग्रामीण परिसरात अशा प्रकारचे गुन्हे केल्याची दाट शक्यता आहे, असेही पोलिसांनी न्यायालयात सांगितले.