पुणे – मुलीसमवेत दुचाकीवरुन कामावर जाणाऱ्या महिला दुचाकीवरुन खाली पडल्यानंतर समोरुन येणारा ट्रकचा लोखंडी भाग लागल्याने दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यु झाला. हि घटना शनिवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास कोंढवा येथील मेमोरी गार्डन समोरील रस्त्यावर घडला.
पुजा शैलेंद्र चतुर्वेदी (वय 35, रा. हेवन हिल्स सोसायटी, कोंढवा) असे अपघातात मृत्यु झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची मुलगी नंदिनी चतुर्वेदी हिने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या आई पुजा चतुर्वेदी या एका खासगी कंपनीमध्ये नोकरीस होत्या. फिर्यादी शनिवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या आईला कामाच्या ठिकाणी सोडण्यासाठी दुचाकीवरुन जात होत्या. त्यांची दुचाकी एनआयबीएमकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मेमोरी गार्डन येथे आली. त्यावेळी फिर्यादीच्या दुचाकीसमोर अचानक दुसरी गाडी आल्याने त्यांनी तत्काळ ब्रेक दाबला.
या घटनेमुळे तोल गेल्याने फिर्यादी गाडीच्या समोरील बाजूला पडल्या. तर त्यांच्या पाठीमागे बसलेल्या त्यांच्या आई रोडच्या उजव्या बाजुला पडल्या. त्याचवेळी समोरुन आलेल्या एका भरधाव ट्रकचा लोखंडी भाग त्यांच्या डोक्याला लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यामध्येच त्यांचा मृत्यु झाला. या घटनेनंतर ट्रकचालक पोलिसांना खबर न देता तेथून पळून गेला.