पुणे – कर्वेनगर उड्डाणपूलाच्या कठड्याला केटीएम दुचाकी धडकून भिषण अपघात झाला. यामध्ये दोन तरुणांचा जगीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री ११ वाजता घडली. मृत तरुण रामनगर परिसरातील रहिवाशी आहेत.
सलीम कोकरे (वय २४ वारजे गावठाण), शंकर अंकुश इंगळे (वय २२ रामनगर) अशी त्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान वानवडी परिसरातील भैरोबानाला चौकात दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक झाल्याने दोघांचा मृत्यू झाला होता.
वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर खटके यांनी दिलेल्या माहितीनुसार, समील व शंकर दोघेही वारजेकडून कोथरुडच्या दिशेने जात होते. कर्वेनगर येथील उड्डाणपूलाच्या कठड्याला त्यांच्या केटीएम दुचाकीची जोरात धडक बसली. गाडीचा वेग प्रचंड असल्यामुळे ती वळणावरील कठड्यावर धडकली. त्यामध्ये दोघे गंभीर जखमी होऊन मृत झाले. अशी माहिती प्रत्यक्षदर्शी यांनी पोलिसांना दिली.
दुचाकी स्पिल झाल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो आहे. कर्वेनगर पोलिस चौकीच्या समोरील बाजूला घटना घडल्याने तत्काळ पोलिसांनी धाव घेतली. अपघातामुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.