Pune Accident: शहरात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

पुणे – शहरात वेगवेगळ्या भागात झालेल्या अपघाताात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मुंढव्यातील केशवनगर तसेच मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघाताच्या घटना घडल्या.
मुंढवा भागातील केशवनगर परिसरात ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

दोन दिवसांपूर्वी दुचाकीस्वार विनोद गेंदलाल सूर्यवंशी (वय ४५, रा. संभाजी चौक, केशवनगर, मुंढवा) सकाळी आठच्या सुमारास केशवनगर-मांजरी रस्त्यावरून निघाले होते. त्यावेळी भरधाव ट्रकने दुचाकीस्वार सूर्यवंशी यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सूर्यवंशी यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रकचालक राजेंद्र केंद्रे (वय ४३, रा. वाडेबोल्हाई, ता. हवेली, जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी विनोद पिल्ले यांनी यासंदर्भात मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उपनिरीक्षक एस. आर. काटे तपास करत आहेत.

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर जांभुळवाडी दरी पूलावर बंद पडलेल्या अवजड ट्रकवर टेम्पो आदळून टेम्पोतील एकजण मृत्युमुखी पडल्याची घटना दोन दिवसांपूर्वी रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली. अपघातात टेम्पोचालक जखमी झाला आहे. सायास शंकर चाटे (वय ३८, रा. चिंबळी, बर्गे वस्ती, ता. खेड, जि. पुणे) असे मृत्यमुखी पडलेल्याचे नाव आहे.

अपघातात टेम्पो चालक प्रदीप बाळासाहेब देवडकर (वय २५, रा. इंद्रायणी पार्क, ता. हवेली, जि. पुणे) जखमी झाला. पोलीस हवालदार अजित कोकरे यांनी यासंदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठण्यात फिर्याद दिली आहे. बाह्यवळण मार्गावर अवजड ट्रक बंद पडल्याने दरीपुलाजवळ रस्त्याच्या कडेला लावण्यात आला होता. रात्री पावणेनऊच्या सुमारास भरधाव वेगाने निघालेल्या टेम्पो रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या ट्रकवर आदळला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.