पुणे – शहरात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. वारजे आणि सोलापूर रस्त्यावर अपघाताच्या घटना घडल्या. वारजे पुलाजवळ टेम्पोच्या धडकेने सायकलस्वार बेकरी कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सकीउल्ला आलम खान (वय ५०,रा. बराटे चाळ, कर्वेनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या सायकलस्वाराचे नाव आहे. खान कर्वेनगरमधील रितू बेकरीत कामाला आहेत. ते सायकलवरून वारजे, कर्वेनगर भागात बेकरीतील खाद्यपदार्थांची विक्री करतात.
खान सकाळी पाचच्या सुमारास सायकलवरून वारजे भागातून निघाले होते. त्यावेळी भरधाव टेम्पोने सायकलस्वार खान यांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पोचालक पसार झाला. बेकरी कामगार हजरत अली शेख यांनी यासंदर्भात वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक पडवळे तपास करत आहेत.
पुणे-सोलापूर रस्त्यावर लोणी काळभोर परिसरात ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने सहप्रवासी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गंगाधर शंकर नारनवरे (वय ६६, रा.हमालवाडा, ओैरंगाबाद) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवाशाचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार त्र्यंबक एंगडे (वय ३२, रा. शिंदवणे, ता. हवेली) जखमी झाले असून त्यांनी याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दुचाकीस्वार एंगडे त्यांच्या बहीणीचे सासरे गंगाधर नारनवरे यांनी घेऊन सोलापूर रस्त्याने निघाले होते. त्या वेळी भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या नारनवरे यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.