पुणे – टँकरच्या धडकेत काम संपवून घरी निघालेल्या बांधकाम कंपनीतील प्रकल्प व्यवस्थापकाचा (प्रोजेक्ट मॅनेजर) मृत्यू झाल्याची घटना वडगाव ब्रिज परिसरात घडली. युवराज शंकर चव्हाण (६५ रा. देशमुख नगर, शिवणे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या मुलगा नाथसिंह युवराज चव्हाण ( २४) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टँकर चालक भगवान पांडुरंग क्षिरसागर ( ४८, रा. माळेवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, युवराज चव्हाण हे बिबवेवाडी येथील एका कन्स्ट्रक्शन कंपनीत प्रोटेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होते. १८ सप्टेंबर रोजी ते काम संपवून सायंकाळी पावणे सातच्या दरम्यान दुचाकीवरुन घरी निघाले होते. सांगली वरुन मुंबईकडे जाणर्या भरधाव ट्रकने युवराज चव्हाण चालवत असलेल्या दुचाकीला पाठीमागुन जोराची धडक दिली. यात युवराज चव्हाण गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण जाधव करत आहेत.