पुणे – शहरातील नव्या करोना बाधितांची संख्या लक्षणीय घटत आहे. त्यामुळे सण-उत्सव काळात शहरातील दुकाने रात्री 11 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली होती. त्यावर राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आता पुणे शहरातील दुकाने रात्री 10 ऐवजी 11 पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बुधवारी काढले.
दुकानांसह रेस्टॉरंट, बार आणि फूड कोर्ट रात्री बारापर्यंत खुली ठेवण्यासही मुभा देण्यात आली आहे. परिणामी, करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत शहराचे रुतलेले अर्थचक्र सणांच्या कालावधीत पूर्वपदावर येण्यास मदत होणार असल्याची भावना व्यावसायिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मागील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2020 मध्ये करोनाची पहिली लाट शहरात ओसरली होती.
त्यानंतर मागील दिवाळीत शहरातील व्यवसाय रुळावर आले होते. मात्र, त्यानंतर लगेच पुढील तीन महिन्यांतच शहराला दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागला. त्यामुळे पुन्हा शहरातील व्यवसाय कोलमडले होते. त्यानंतर जवळपास आठ महिन्यांनी पुन्हा करोनाच्या रुग्णांचा आकडा नीचांकी असल्याने शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. आता दुकानांच्या वेळा रात्री 10 ऐवजी 11 पर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता ग्राहकांनाही विविध खरेदीसाठी पुरेसा वेळ मिळणार असल्याने समाधानाचे वातावरण आहे.