Pune Acb News : पुणे पोलिस दलाच्या गोटातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. तक्रार अर्जाच्या चौकशी प्रकरणात तब्बल २८ लाख रुपयांची लाच घेताना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. (Pune Acb News) ही कारवाई शनिवारी बंडगार्डन रस्ता परिसरातील एका तारांकित हॉटेलसमोर सापळा रचून करण्यात आली. या प्रकरणात एका खासगी व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले असून, या घटनेमुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. (Pune Acb News) एसीबीच्या माहितीनुसार, वैशाली तोटेवार या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना त्यांच्या ताब्यात काही तक्रार अर्ज चौकशीसाठी देण्यात आले होते. त्यापैकी एका प्रकरणात त्यांनी तक्रारदाराकडे ३० लाख रुपयांची लाच मागितली होती. (Pune Acb News) तक्रारदाराने सुरुवातीला २ लाख रुपये दिल्यानंतर उर्वरित २८ लाखांची मागणी करण्यात आली. यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. तोटेवार यांनी लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी एका खासगी व्यक्तीला पाठवले होते. सापळ्यात त्या व्यक्तीस २८ लाख रुपये घेताना पकडण्यात आले. त्यानंतर तोटेवार यांनाही ताब्यात घेण्यात आले. (Pune Acb News) कारवाईनंतर एसीबी पथकाने तोटेवार यांच्या पुणे पोलीस आयुक्तालयातील कार्यालयासह त्यांच्या निवासस्थानी झडती सुरू केली आहे. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, गुन्हा नोंदवल्यानंतर अटकेची कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (Pune Acb News) दरम्यान, तोटेवार यांची नुकतीच पदोन्नती होऊन त्यांची मुंबई लोहमार्ग पोलीस दलात पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली होती. शुक्रवारी त्यांना पुणे पोलीस दलातून कार्यमुक्त करण्यात आले होते. त्यांच्या विरोधातील या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. (Pune Acb News)