पालिकेच्या नियोजित वैद्यकीय महाविद्यालय प्रक्रियेला वेग
पुणे – राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर महापालिकेच्या नियोजित वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रक्रियेला वेग आला आहे. नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे (एमयुएचएस) पथक शुक्रवारी नियोजित जागेची पाहणी करणार आहे. याच पाहणीदरम्यान “एमयूएचएस’कडून महाविद्यालयाच्या अंतिम मंजुरीसाठी हमीपत्र दिले जाण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या आवारात साडेबारा एकर जागेत माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. महाविद्यालयाच्या ट्रस्ट स्थापनेला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानंतर महापालिका प्रशासनाने धर्मादाय आयुक्त, मुंबईतील वैद्यकीय शिक्षक संचालक आणि “एमयूएचएस’ला या संदर्भातील प्रस्ताव दिले आहेत.
महाविद्यालयाची महापालिकेच्या नावे असलेली जागा ट्रस्टच्या नावे असावी, अशी त्रुटी “एमयूएचएस’ने मागील आठवड्यात काढली होती. त्यावर ही जागा महापालिका आणि ट्रस्टच्या नावे संयुक्तरित्या करण्याचा प्रस्ताव पालिकेने “एमयूएचएस’ला पाठवून ही त्रुटी दूर केली आहे.
यानंतर “एमयूएचएस’ने राज्य सरकारला महाविद्यालयाचा प्रस्ताव पाठवला, या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. महाविद्यालयाची आवश्यकता प्रमाणपत्र राज्य सरकारने दिले आहे.
“एमयूएचएस’कडून पाहणीनंतर महाविद्यालयाच्या अंतिम मंजुरीसाठी हमीपत्र दिले जाईल. तसेच, जानेवारीमध्ये राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या पथक भेट देणार असून त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयास अंतिम मंजुरी मिळणार आहे. दरम्यान, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचे वर्ग सुरू करण्यासाठी मनुष्यबळाची आणि लेक्चर्ससाठी मंगळवार पेठेतील सणस शाळेत हॉलची व्यवस्था करण्यात येणार आहे.
– डॉ. आशिष भारती, प्रभारी आरोग्य प्रमुख, महापालिका