पुणे – चतुश्रृंगी पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेत त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल व काडतूस हस्तगत केले. या पिस्तूलाची किंमत बाजारभावानूसार 20 हजार इतकी आहे. त्याने पिस्तूल कशासाठी बाळगले होते, याची चौकशी करण्यात येत आहे. रोहित सुरेश धोत्रे(21,रा.पांडवनगर) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार चतुश्रृंगी पोलिसांचे गस्ती पथक सोमवारी परिसरात गस्त घालत होते. यावेळी पोलिस अंमलदार तेजस चोपडे व वासिम सिद्दीकी यांना रोहित धोत्रे हा पिस्तूल घेऊन उतारा जिमजवळ थांबला असल्याची खबर मिळाली. त्यानूसार तातडीने पथके तयार करुन तेथे धाव घेण्यात आली. रोहित हा संशयास्पदरित्या फिरताना दिसताच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तूल व एक काडतूस सापडले. त्याच्यावर चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त सागर पाटील, सहायक आयुक्त रमेश गलांडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार लांबतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहन जाधव, महेश भोसले, अंमलदार तेजस चोपडे, वसिम सिद्दीकी, प्रकाश आव्हाड, सारस साळवी, शैलेश सुर्वे, संतोष जाधव यांच्या पथकाने केली.