पुणे – किरकोळ कारणावरून टोळक्याने पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना भैरवनगर धानोरी येथे घडली. याप्रकरणी ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत धवल रविकांत लोणकर (वय ३८, रा. भैरवनगर, धायरी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी धवल लोणकर हे विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात नाईक पदावर कर्तव्यास आहेत. फिर्याद केल्यानुसार त्यानुसार विजय सूर्यकांत केंजळे (वय २८,) सूर्यकांत गणपतराव केंजळे (वय ५८), चंद्रकांत गणपतराव केंजळे (वय ५२), विशाल चंद्रकांत केंजळे (वय २४), निमेश किशोर जगताप (वय २१, सर्व रा. गुडविल संस्कृती, भैरवनगर, धानोरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना दि. ८ ऑगस्टला रात्री साडे दहाच्या दरम्यान भैरवनगर धानोरी लेन नंबर-१० येथे घडली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी लोणकर हे कुटुंबियांसोबत कार मधून घरी परत येत होते. यावेळी भैरवनगर धानोरी लेन नंबर-१० येथे एक जण अचानक त्यांच्या कारसमोर आल्याने त्यांनी कार थांबवली. यावेळी आरोपी फिर्यादीच्या जवळ आला आणि माझ्या अंगावर गाडी घालतो का? म्हणत शिवीगाळ करू लागला.
यावेळी फिर्यादी यांनी गाडीचा धक्का लागला नसल्याचे सांगितले. तसेच, फिर्यादी लोणकर हे कारच्या खाली उतरल्यावर आरोपीने त्यांना धक्काबुक्की करून आरडाओरड केली. यानंतर इतर आरोपींनी सुद्धा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, त्यांच्यातील एका आरोपीने हत्याराने फिर्यादी यांच्या नाका, तोंडावर मारून जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गंपले तपास करत आहेत.