पुणे – महापालिकेमधील ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे शालेय शिक्षण महापालिकेच्याच शाळेमध्ये केलेले आहे, अशांना प्रोत्साहन म्हणून एक वेतनवाढ देण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका अर्चना पाटील यांनी केली होती. तसा एक प्रस्ताव त्यांनी स्थायी समितीसमोर ठेवला होता. समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत चर्चा करून मान्यता देण्यात आली असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
शहरात महापालिकेच्या प्राथमिक तसेच माध्यमिक विभागाच्या शाळा आहेत. यामध्ये 1 लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, मागील काही वर्षांपासून या शाळांमधील पटसंख्या घटत आहे. महापालिका प्रशासनाकडून त्याबाबत वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्यात येतात. याबाबत नगरसेवकदेखील महापालिका प्रशासनाला मदत करत असतात. याला अनुसरून भाजप नागसेविका व स्थायी समिती सदस्य अर्चना पाटील यांनी स्थायी समितीसमोर याबाबत प्रस्ताव ठेवला.
त्यानुसार महापालिकेमधील ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे शालेय शिक्षण पुणे महापालिकेच्याच शाळेमध्ये केलेले आहे, अशांना प्रोत्साहन म्हणून एक वेतनवाढ देण्यात यावी. जेणेकरून येणाऱ्या पुढील काळामध्ये शहरामधील नागरिक हे त्यांच्या पाल्यांचे प्रवेश पालिकेच्या शाळांमध्ये घेतील. नुकतेच पालिकेमध्ये समाविष्ट गावांमधील विद्यार्थी पुढील काळामध्ये पुणे महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतील व पुणे मनपाच्या शाळेमधील पटसंख्या वाढण्यास मदत होईल, असे या प्रस्तावात नमूद आहे.