विश्रांतवाडी – उच्चांकी मतदानाने बापूसाहेब पठारे निवडून येतील. वडगावशेरी मतदारसंघात नवा राजकीय इतिहास घडविला जाईल, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. पदयात्रेच्या शेवटी जाहीर सभा झाली. यावेळी आमदार पवार यांनी आक्रमकपणे विरोधकांचा समाचार घेतला.
वडगावशेरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि.९) आमदार रोहित पवार यांच्या तुफानी प्रचार पदयात्रेने आणि जाहीर सभेने राजकीय वातावरण ढवळून काढले. यावेळी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी व लोहगावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोहित पवार म्हणाले की, काँग्रेस -राष्ट्रवादीच्या काळात विकास होत होता. तो भाजपने थांबवला. येणाऱ्या कंपन्या दिल्लीत मुजरा करणाऱ्यांनी गुजरातमध्ये हलवल्या. त्यामुळे इथल्या होतकरू तरुणाईवर अन्याय झाला. १५ लाख युवा दरवर्षी नोकरी, रोजगार शोधत फिरत असतो. हे पाहून शांत बसू नका, लढायला हवे. बुथवर लक्ष द्या. आपले सरकार येत आहे, ६० हजार कोटींचा भ्रष्टाचार उकरून काढू. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात मलिदा खाऊन पुतळा पडणार असेल, तर हे पाप कोणाचे ? असाही प्रश्न रोहित पवार यांनी विचारला.
रामकृष्ण हरी,वाजवू तुतारी, शरद पवार साहेबआगे बढो, महाविकास आघाडी आगे बढो, अशा घोषणा त्यांनी उपस्थित समुदायाला द्यायला लावल्या, त्याला अर्थातच प्रचंड प्रतिसाद मिळाला.