पुणे – महिलेचा खून करणाऱ्या चालकाला पाच लाख रुपये दंड आणि जन्मठेपेची शिक्षा सत्र न्यायाधीश पी.पी जाधव यांनी सुनावली. एका महिलेच्या साक्षीप्रमाणे बाहेर गेलेला आरोपी पुन्हा बंगल्याच्या दिशेने गेला होता. आरोपी हा मुंबईचा राहणारा होता. परंतु मोबाइल लोकेशनप्रमाणे आरोपी हा घटनास्थळावर हजर होता. मयताशी झालेल्या झटापटी मध्ये आरोपीच्या कोपराजवळ मार लागल्याच्या ताज्या खुणा आढळून आल्या होत्या. मयताचे रक्त आरोपीच्या कपड्यावर मिळुन आले होते. हा परिस्थितीजन्य पुरावा पाहाता आरोपीनेच गुन्हा केल्याचे सिद्ध होते, असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगर ेपाटील यांनी केला.
चंद्रदेव उर्फ चंदन उमेद कामथी (वय:-34 वर्ष, रा. नेपन्सी रोङ मुंबई) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी 12 साक्षीदार तपासले. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी लोणावळा पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल संतोष सोनावणे यांनी मदत केली. तत्कालीन पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी तपास केला. ही घटना खंडाळा येथील हिलटॉप कॉलनी बंगला नं. 67 येथे घङली होती.
रंजना (वय 55) यांचा खून केल्याप्रकरणी पती जगन्नाथ मकर यांनी फिर्याद दिली आहे. पती-पत्नी पल्लवी पारेख यांच्या बंगल्यात 30 वर्षांपासून माळीकाम करत असून, तेथेच राहतात. घटनेच्या आदल्या दिवशी फिर्यादींच्या ओळखीचा चालक चंदन हा पल्लवी पारेख यांची होंडा सिटी गाडी घेऊन आला. तेथे राहिला.
दुसऱ्या दिवशी सकाळी फिर्यादी लग्नासाठी वाघोली येथे निघाले. त्यावेळी त्यानेच गाडीतून रेल्वे स्टेशनला सोडले. दिवसभर सहारा ऍम्बे व्हॅली येथे राहणार असल्याचे सांगितले. फिर्यादी रात्री परत आले. त्यावेळी पत्नीचा मृतदेह मिळून आला. चालकासोबत झालेल्या झटपटीत मृत्यू झाल्याचे ओळखून त्यांनी पोलिसात फिर्याद दिली.