पुणे – सोसायटीचा रस्ता वापरास मनाई केल्याने रखवालदाराला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना एनआयबीएम रस्त्यावरील एका सोसायटीत घडली. याप्रकरणी टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय माळी (वय ३९, रा. उंड्री) यांनी यासंदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
माळी कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर असलेल्या कुमार प्रिटॉन सोसायटीत रखवालदार आहे. दोन दिवसांपूर्वी सोसायटीच्या आवारातील रस्त्यावरुन टोळके निघाले होते. त्या वेळी सोसायटीतील रस्ता खासगी असून सार्वजनिक वापरास मनाई करण्यात आली आहे, असे माळी याने आरोपींना सांगितले. त्यानंतर तुला बघून घेतो, अशी धमकी घेऊन आरोपी तेथून निघून गेले.
दुपारी पावणेचारच्या सुमारास टोळके पुन्हा सोसायटीच्या आवारात शिरले. माळी याला बेदम मारहाण करून प्लास्टिक खुर्ची डोक्यात मारली. आरोपी दुचाकीवरून पसार झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बर्गे तपास करत आहेत.