पुणे | ओतूरला भरवस्तीत मोबाईल टॉवरला आग

आगीत टॉवर यंत्रणा जळून खाक,  रहिवाशांना बाहेर काढल्याने दुर्घटना टळली

ओतूर (प्रतिनिधी)- येथे मध्यवस्तीत वरील आळी येथील अशोक काशिद गुरूजी यांच्या इमारतीवर बसवलेल्या मोबाईल कंपनीच्या टॉवरला आज (शुक्रवारी) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली. यात मोबाईल टॉवरची संपूर्ण यंत्रणा जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले.

या इमारतीत डॉ. काशीद यांचे आयुर्वेदिक रुग्णालय व निवासस्थान असून आगीने रौद्ररूप धारण करताच इमारतीतील रहिवाशांचे वेळेत स्थलांतर करण्यात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लागल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळताच सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी हजर झाले.

“ओतूर हद्दीत अनेक मोबाईल कंपन्यांचे टॉवर आहेत. दाट नागरी वस्ती असल्याने अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये म्हणून काळजी घेण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या दुर्घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत. ग्रामपंचायत महसूल वापरून स्वमालकीचा अग्नी शामक बंब त्वरित घ्यावा.
-धनंजय डुंबरे, संचालक विघ्नहर सहकारी साखर कारखाना

बघ्यांची झालेली प्रचंड गर्दी हटविण्यात येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. काही वेळातच जुन्नर नगर परिषदेच्या आगीच्या बंबाने आग आटोक्‍यात आणण्यात यश मिळविले. उंच इमारतीवरील टॉवरला लागलेल्या आगीचे उंच उंच लोळ उठल्याने व संपूर्ण परिसर धुराने व्यापल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. स्थानिक लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.ओतूर मध्ये बराच वेळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.