पुणे – दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद ज्येष्ठ नेते शरद पवार भूषवणार आहेत. येत्या दि. २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ला हे संमेलन होणार आहे. याचे यजमानपद सरहद या संस्थेकडे आहे.
दिल्ली ही देशाची राजकीय राजधानी असल्यामूळे येथे होणारे संमेलन सर्वसमावेशक व्हावे या भावनेतून या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अनुभवी, ज्येष्ठ आणि साहित्यरसिक व्यक्ती व्हावी असा संयोजक समितीने प्रयत्न केला त्यातून पवार यांनी स्वागताध्यक्ष व्हावे अशी संस्थेने विनंती केली आणि ती त्यांनी सोमवारी (दि. २) मान्य केल्याचे सरहद संस्थेचे संजय नहार, डॉ. शैलेश पगारिया, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मिलिंद जोशी आणि सुनिता राजे पवार तसेच संयोजन समितीचे डॉ. सतीश देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शरद पवार हे केवळ उत्तम वाचक अथवा साहित्यप्रेमी नसून महाराष्ट्रातून सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळीशी प्रारंभापासून जोडले गेले आहे. त्यांनी औरंगाबाद, नाशिक, चिपळूण, आणि सासवड येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले आहे; तर १९९० साली त्यांनी स्वागताध्यक्ष व्हावे असे पुण्यातील संमेलनात समितीने ठरवले होते. मात्र, त्यावर्षी ते होऊ शकले नाही. यंदा दिल्लीमध्ये होणाऱ्या संमेलनात स्वागताध्यक्षपद स्विकारण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या संमेलनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, अन्य पक्षांचे प्रमुख आणि नेते, महाराष्ट्राचे परंतु केंद्रात असलेले नितीन गडकरी, मुरलीधर मोहोळ आदी मंत्री आणि विनोद तावडे हे पदाधिकारी या संमेलनात सहभागी होणार असल्याचे यावेळी सांगितले.