पुणे – विधानसभा निवडणुकीसाठी पीएमपी प्रशासनाकडून 968 जादा गाड्या देण्यात येणार आहेत. याबाबतची मागणी प्रशासन पातळीवरून पीएमपीला आली होती. त्यानुसार दि. 19 आणि दि. 20 नोव्हेंबरला निवडणूक कामकाजासाठी पीएमपीच्या जादा गाड्या देण्यात येणार आहेत.
पीएमपीच्या ताफ्यात सध्या 1880 बस गाड्या आहेत. त्यांपैकी सरासरी 1520 बस गाड्या प्रत्यक्षात मार्गांवर असतात. उर्वरित गाड्या ब्रेकडाऊन, देखभाल व दुरुस्ती, चार्जिंग यांसारख्या अन्य कारणांसाठी डेपोंमध्येच असतात. या मार्गावरील गाड्यांमार्फत दररोज 9 ते 10 लाखांच्या घरात प्रवासी प्रवास करतात.
त्यातच आता निवडणुकीसाठी ताफ्यातील 968 बस देण्यात येणार आहेत. त्यामुळे मार्गावर प्रवाशांसाठी बस अपुर्या पडणार आहेत. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने निवडणुकीच्या कामकाजासोबतच या दिवशी पुणेकर प्रवाशांचा प्रवास वेगवान, सुखकर होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
“निवडणुकीच्या कामासाठी पीएमपीकडील 968 गाड्या देण्यात येणार आहेत, तशी मागणी आम्हाला आली आहे. त्यानुसार आमचे नियोजन आहे. आवश्यकता असेल तिथे गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील.” – सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल