पुणे – 94 हजार विद्यार्थ्यांना 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण

इयत्ता बारावीचा 83.40 टक्‍के निकाल

पुणे – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 83.40 टक्‍के इतका लागला आहे. गतवर्षी 83.01 टक्‍के इतका निकाल लागला होता. यंदा निकालात किचिंतशी वाढ झाल्याची माहिती “सीबीएसई’ बोर्डाकडून देण्यात आली. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली.

“सीबीएसई’मार्फत 15 फेब्रुवारी ते 4 एप्रिल या कालावधीत बारावी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी देशभरातील 12 हजार 441 हजार शाळांतील 12 लाख 18 हजार 393 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी 12 लाख 5 हजार 484 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील 10 लाख 5 हजार 427 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांची टक्‍केवारी 83.40 इतकी आहे. दरवर्षी प्रमाणेच यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली. उत्तीर्ण झालेल्या मुलींची टक्केवारी मुलांच्या टक्केवारीच्या तुलनेत 9 टक्‍क्‍यांनी जास्त आहे. या परीक्षेत 17 हजार 693 विद्यार्थ्यांना 95 टक्के आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. तर 90 टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 94 हजार 299 इतकी आहे.

तिरुवनंतपुरम्‌ विभागाचा निकाल सर्वाधिक
सीबीएसईचे देशपातळीवर दहा विभाग आहेत. त्यात तिरुवनंतपुरम्‌ विभागाने 98.20 टक्‍क्‍यांसह सर्वांत पहिले स्थान मिळविले. महाराष्ट्राचा समावेश असलेल्या चेन्नई विभागाने 92.93 टक्‍के घेत द्वितीय स्थान प्राप्त केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत चेन्नई विभागाची टक्केवारी जवळपास एका टक्‍क्‍याने घटली. तर 91.87 टक्‍क्‍यांसह दिल्ली विभाग तृतीय स्थानी आहे.

हंसिका शुक्‍ला, करिश्‍मा अरोरा देशात टॉपर
राष्ट्रीय पातळीवरील निकालात विद्यार्थिनींनी बाजी मारतानाच पहिल्या सातही क्रमांक स्थान पटकावले. उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या दिल्ली पब्लिक स्कूलमधील हंसिका शुक्‍ला आणि मुझफ्फरनगरच्या एस. डी. पब्लिक स्कूलच्या करिश्‍मा अरोरा यांनी प्रत्येकी 499 गुण मिळवित अव्वल स्थान पटकाविले आहे. गौरांगी चावला, ऐश्‍वर्या आणि भाव्या या तीन विद्यार्थिनी 498 गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.