पुणे – हडपसर येथील प्रकाश अण्णा गोंधळे यांच्या खून प्रकरणात हिंदू राष्ट्र सेनेच्या नऊ जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी हा निकाल दिला. विकी जाधव, वैभव भाडळे, अक्षय इंगुळकर, श्रीकांत आटोळे, अमोल शेगडे, राहुल कौले, विकी पाटील, सूरज फडके, आकाश शिंदे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. जन्मठेपेबरोबरच प्रत्येक आरोपीला 20 हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला असून, दंडाव्यक्तिरिक्त आरोपींनी 1 लाख 50 हजार रुपये गोंधळे यांच्या कुटुंबीयांना द्यावी, असे आदेशात नमूद केले आहे.
ही घटना 2013 ची आहे. जूनमध्ये गोंधळे यांच्या घरावर हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्यात त्यांनी दरवाजावर पेट्रोल टाकून दरवाजा जाळला होता. घरात घुसून नुकसान केले होते. या प्रकरणाची फिर्याद गोंधळे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर 8 जुलै 2013 रोजी रात्री पावण अकराच्या सुमारास आरोपींनी गोंधळे यांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर कोयत्याने वार केले. यात त्यांचा मृत्यू झाला.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची सरकारी वकिल म्हणून नियुक्ती केली होती. खटल्याचे कामकाज चालू असताना 18 जानेवारी 2020 रोजी फिर्यादी राजेंद्र पिंगळे यांनी यांच्या मुलावर आरोपींनी हल्ला केला होता. साक्षीदारांवरसुद्धा आरोपींकडून दबाव टाकण्यात येत होता. गोंधळे यांच्यावर केलेला हल्ला अतिशय क्रूर आहे. फिर्यादीवरसुद्धा हल्ला करण्यात आला आहे, असा युक्तिवाद ऍड. निकम यांनी केला. तो ग्राह्य धरीत सत्र न्यायाधीश नांदेडकर यांनी आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.