पुणे – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता कालावधीत पुणे विभागाच्या भरारी पथकाने पुणे जिल्ह्यातील कारवाईत अवैध हातभट्टी दारू, देशी, विदेशी दारूची वाहतूक, विक्री व इतर साहित्य असा एकूण ९ लाख ४९ हजार ७६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक नरेंद्र थोरात यांनी दिली आहे.
पुणे विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईत ५ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर २०२४ दरम्यान अवैध दारूनिर्मिती वाहतूक व विक्रीवर आळा घालण्यासाठी मोहीम आखण्यात आली. यात पुणे जिल्ह्यातील गावठी हातभट्टी दारू निर्मितीच्या, बनावट विदेशी मद्यनिर्मिती, तसेच अवैध दारूविक्रीच्या ठिकाणावर छापे मारून एकूण ८ गुन्ह्यांची नोंद केली असून, त्यामध्ये ६ वारस व २ बेवारस गुन्ह्यांचा समावेश आहे.
या कारवाईत आतापर्यंत ६ आरोपीविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यापुढेही निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अशाच प्रकारची कारवाई सुरू राहणार असून, कोठेही अवैध दारू व्यवसाय सुरू असल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.