पुणे – चारचाकीमधून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अपहरण करून लुटणाऱ्या दोघांना सात वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी 46 हजार रुपये दंडाची शिक्षा सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी सुनावली. दंडाच्या रकमेतील 50 हजार रुपये फिर्यादी यांना देण्यात यावे. दंड न भरल्यास तीन महिने कारावास भोगावा लागेल, असे निकालात म्हटले आहे.
ललित दीपक खोल्लम (वय 28) आणि मयूर दिलीप राऊत (वय 21, दोघेही, रा. गहुंजे) असे शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. त्यांना जबरी चोरी, अपहरण आणि इतर कलमांनुसार शिक्षा सुनावण्यात आली आहे. याबाबत चंदन राजकुमार शर्मा (वय 20 , रा. आंबेगाव) यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी पाहिले. तत्कालीन उपनिरीक्षक शिवदास गायकवाड यांनी या गुन्ह्याचा तपास केला. कोर्ट पैरवी अधिकारी सहायक उपनिरीक्षक संजय जाधव, हवालदार पुणेकर, जाधव आणि नाईक गाढवे यांनी कामकाज पाहिले आहे.
13 ऑगस्ट 2015 रोजी रात्री पुणे-बंगरुळु महामार्गावर हा प्रकार घडला होता. फिर्यादी यांना आंबेगावला जायचे असल्याने महामार्गावर थांबले होते. त्यामुळे दोन्ही आरोपींना त्यांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवले. त्यानंतर त्यांना बंदूक व चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोख 50 हजार रुपये, दोन मोबाईल असा मिळून 71 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरला. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यास चांदणी चौक येथे सोडून निघून गेले. जाताना त्यांनी फिर्यादी यांच्या डोळ्यांवर मिरची पुडचा स्प्रे मारला होता.