पुणे – तीन जागांसाठी 67 अर्ज; आघाडीत सर्व उमेदवार राष्ट्रवादीचे

पुणे – नगरसेवकपदाच्या तीन जागांच्या पोटनिवडणुकीसाठी 67 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज भरण्याचा गुरुवारी अखेरचा दिवस होता. त्यामुळे ऑनलाइन अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी अर्ज जमा केले आहेत. दरम्यान, या निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेत युती झाली असून भाजप 2 तर शिवसेना एका जागेवर निवडणूक लढवित आहे. तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडी झालेली असली तरी, या तीनही जागांसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवार देण्यात आला असून कॉंग्रेस एकाही जागेवर निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेच्या प्रभाग क्र. 1 “अ’, आणि समाविष्ट गावांचा नव्याने झालेला प्रभाग क्र. 42 च्या नगरसेवक पदाच्या दोन जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या तीन जागांसाठी 52 उमेदवारांनी 67 उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजय दहिभाते यांनी दिली. त्यानुसार प्रभाग क्र. 1 “अ’मध्ये भाजपकडून ऐश्‍वर्या जाधव तर राष्ट्रवादीकडून रेणुका चलवादी, वंचित बहुजन आघाडीकडून रोहिणी टेकाळे या प्रमुख उमेदवारांसह 12 उमेदवारांनी 18 अर्ज दाखल केले आहेत. तर प्रभाग क्र. 42 “अ’च्या जागेसाठी शिवसेनेकडून उल्हास शेवाळे, राष्ट्रवादीकडून गणेश ढोरे आणि संजय हरपळे असे दोन जणांचे अर्ज दाखल झाले. त्यामुळे याठिकाणी एकूण 24 उमेदवारांकडून 30 अर्ज भरले गेले आहेत. तर प्रभाग क्र. 42 “ब’च्या सर्वसाधारण महिला आरक्षित जागेसाठी भाजपकडून अश्‍विनी पोकळे तर राष्ट्रवादीकडून आशा बेनकर आणि भाग्यश्री कामठे असे दोन अर्ज आले असून एकूण 16 उमेदवारांचे 19 अर्ज आले आहेत. येत्या 23 जुनला या तीन जागांसाठी निवडणूक होणार असून 24 जूनला मतमोजणी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.