पुणे – शहरात करोनाची साथ ओसरत आहे. त्यात आणखी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. शहरातील एकूण सक्रीय बाधितांपैकी तब्बल 65 टक्के बाधित घरीच उपचार घेत असल्याचे समोर आले आहे.
शहरात ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून नव्या करोना बाधितांची संख्या घटत झाली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दि.6 नोव्हेंबरअखेर शहरातील सक्रीय बाधितांची संख्या 5 हजार 428 आहे. त्यात, तब्बल 3 हजार 163 जण घरीच उपचार घेत आहेत.
तर शासकीय रुग्णालयांमध्ये सध्या अवघे 822 जण उपचार घेत आहेत. खासगी हॉस्पिटलमध्ये 1,369 जण उपचार घेत आहेत. तर महापालिकेच्या कोविड केअर सेंटर येथे 143 जण उपचार घेत आहेत.
मृत्यूदर घटला
शहरातील बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात 93.97 टक्के आहे. हे प्रमाण आतापर्यंतचे सर्वाधिक आहे. तर मृत्यूदर आणखी खाली आला असून 2.65 टक्के आहे तर, सक्रीय बाधितांचा आकडा 3.38 टक्के आहे.
नव्याने 241 बाधित
शहरात दिवसभरात नव्याने 241 करोना बाधितांची नोंद करण्यात आली. तर, 298 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे शहरातील एकूण करोना बाधितांची संख्या 1 लाख 62 हजार 888 झाली असून, बरे झालेल्यांची आकडेवारी 1 लाख 53 हजार 139 आहे. प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांची संख्या सध्या 365 असून, त्यातील 230 व्हेन्टिलेटरवर आहेत. दिवसभरात 2,019 स्वॅब टेस्ट करण्यात आल्या. ऍक्टिव्ह केसेसची संख्या 5,428 आहे. तर दिवसभरात करोनाने मृत्यु पावलेल्यांची संख्या 12 असून, 4 जण पुण्याबाहेरील आहेत. एकूण मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 4,321 इतकी झाली आहे.