पुणे – नवीन कात्रज बोगद्याजवळील जांभुळवाडी गावच्या हद्दीत मराठेशाही हॉटेलजवळ सहा वर्षाच्या मुलाचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी आढळून आला. या मुलाचा गळा आवळून खून करत महामार्गाच्या कडेला मृतदेह टाकून दिल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.
आयान शेख (वय सहा वर्षे) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळस्कर यांनी सांगितले, की जांभुळवाडी गावच्या हद्दीत महामार्गाच्या कडेला एका मुलाचे मृतदेह नागरिकांना आढळला. त्यांनी तत्काळ त्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यावेळी त्या मुलाचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यावेळी मुलाचे शोध घेत त्याचे काही नातेवाईक आले होते.
त्यामुळे त्याची ओळख पटविण्यात यश आले आहे. त्या खून कोणी व का केला हे स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, त्या मुलाचा खून करून त्या ठिकाणी मृतदेह टाकला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिसांची पथके तपास करत आहेत.