नोव्हेंबर-2024 डेडलाइन : वाहतूक कोंडी टाळण्याचे प्रयत्न
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. दुसऱ्या मजल्यावरून मेट्रो धावणार असून पहिल्या मजला हा वाहनांसाठी असणार आहे. वाहनांसाठीचा उड्डाणपूल हा सहा पदरी उभारण्यात येणार आहे. या उड्डाणपुलाचे काम नोव्हेंबर 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
दरम्यान, उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत या चौकातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी रस्ता रुंदीकरण, पर्यायी जागेतून रस्ता, चक्राकार वाहतूक मार्ग आदी उपाययोजना करण्यात येणार आहे. यामुळे या चौकात वाहतूक कोंडी होणार नाही, असा दावा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पुणे महापालिकेने केला आहे.
पीएमआरडीएने शिवाजीनगर-हिंजवडी या 23 किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. या मेट्रोमार्गासाठी तसेच विद्यापीठ चौकात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी येथील उड्डाणपूल दोन वर्षांपूर्वी पाडण्यात आला. आता या चौकात भविष्यकालीन नियोजन करून वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार दुमजली उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. या चौकात मेट्रोचे पिलर उभारण्याचे काम सुरू असल्याने औंध, बाणेर, पाषाणकडून येणारी वाहतूक व पुण्यातून या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर पीएमआरडीए व पुणे महापालिकेने संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, पालिकेचे आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमनार, मुख्य अभियंता विवेक खरवडकर, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, उपजिल्हाधिकारी रामदास जगताप, श्रीनिवास बोनाला आदींसह मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.