पुणे – वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ दाखल झालेल्या 23पैकी 6 उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद करण्यात आले आहेत. अधिकृत पक्षाचे “एबी’ फॉर्म न जोडणे, अर्जावर स्वाक्षरी नसणे, अपूर्ण अर्ज, अनामत रक्कम न भरणे आदी विविध कारणांनी हे अर्ज अवैध ठरवण्यात आले.
या मतदारसंघात अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत एकूण 23 उमेदवारांनी 32 अर्ज दाखल केले होते. या उमेदवारी अर्जांची शनिवारी छाननीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यात प्रत्येक अर्जाची तपासणी करण्यात आली. नियमावलीप्रमाणे अर्जाची पूर्तता न करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले, अशी माहिती वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजीव देशमुख यांनी दिली आहे.
छाननीत परिपूर्ण असलेले 17 अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. यात जगदीश मुळीक (भाजप), सुनील टिंगरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस), प्रवीण गायकवाड (वंचित बहुजन आघाडी), डॅनियल लांडगे (एमआयएम), राजेश बेंगळे (बहुजन समाज पक्ष), प्रकाश पारखे (संभाजी ब्रिगेड), बाळाभाऊ पोटभरे (हमारी अपनी पार्टी), गणेश ढमाले (आम आदमी पार्टी), प्रसाद कोद्रे (प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष), जितेंद्र भोसले (अपक्ष), अग्रजीतसेन मुळीक (अपक्ष), संजय भोसले (अपक्ष), चंद्रकांत सावंत (अपक्ष), सतीश मुळीक (अपक्ष), शशिकांत राऊत (अपक्ष), विठ्ठल गुन्हाने(बळीराजा पक्ष), सविता औटी (अपक्ष) आदींचा समावेश आहे.
बाद झालेले अर्ज आणि कारण
भाजपचे योगेश मुळीक, राष्ट्रवादीचे बापू पठारे यांनी डमी अर्ज भरले. पण, दोघांनीही अधिकृत पक्षाचा “एबी’ फॉर्म जोडला नव्हता.
अपक्ष दादू रणसिंग यांनी अर्जासाठी दहा सूचक व अनुमोदक आवश्यक असताना नऊच नावे नोंदविली.
अपक्ष हनुमंत पांडागळे यांचा अर्ज होता. त्यांनी अर्जावर एका ठिकाणी स्वाक्षरीच नव्हती.
अपक्ष विशाल गोरे यांनी अर्जातील माहितीच पूर्ण भरलेली नव्हती.
अपक्ष मोहन लोणकर यांनी अर्ज कोराच ठेवला, अनामत रक्कमही भरली नाही.
चंद्रकांत सावंत यांनी शिवसेनाचा एबी फॉर्म जोडला नाही.