को-विन ऍपचा गोंधळ : तांत्रिक त्रुटींमुळे नावांची नोंदच नाही
पुणे – करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. पहिला टप्पा झाल्यानंतर आता दुसरा टप्पा सुरू झाला तरी, लसीकरणासाठीच्या को-विन ऍपचा गोंधळ काही संपत नाही. लसीकरणासाठी ऍपवर नोंदणी करूनही नोंद न होणे, मोबाइल नंबर चुकीचे अपलोड होणे, या गोंधळामुळे पोलीस विभागातील तब्बल 50 टक्के नावांची नोंद झाली नसल्याचा प्रकार समोर आला आहे.
लसीकरणासाठी कोविन ऍपवर नोंदणी बंधनकारक आहे. मात्र, या ऍपवर जी नोंदणी झाली आहे, त्यात अनेक त्रुटी असल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या अनेक कर्मचाऱ्यांची नावे या ऍपमधून गायब असून अनेकांचे मोबाइल नंबर चुकीच्या पद्धतीने नोंद झाले आहेत. त्याचा सर्वाधिक फटका पोलीस कर्मचाऱ्यांना बसला आहे. लसीकरणासाठी आठ हजार कर्मचाऱ्यांची नोंद पोलिसांकडून करण्यात आली होती.
मात्र, प्रत्यक्षात ऍपवर केवळ चार हजार पोलीस कर्मचाऱ्यांचीच नोंद झाली आहे. त्यामुळे उर्वरीत कर्मचाऱ्यांची नावे गेली कुठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या गोंधळामुळे अनेक पोलीस कर्मचारी लसीकरणापासून वंचित राहिले असून, या गोंधळाचा मनस्ताप महापालिका प्रशासनाला सहन करावा लागत आहे.