पुणे ! 5 तालुक्‍यांना “तौक्‍ते’चा तडाखा; 191 घरांचे नुकसान : 90 व्यक्‍तींचे स्थलांतर

पुणे – तौक्‍ते चक्रीवादळाचा तडाखा जिल्ह्यातील मुळशी, भोर, मावळ, खेड आणि आंबेगाव या तालुक्‍यांना बसला आहे. प्राथमिक माहितीनुसार या चक्रीवादळामुळे जिल्ह्यात 191 घरांचे नुकसान झाले आहे. तर 90 व्यक्‍तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. तर तीन व्यक्‍तींना दुखापत झाली आहे.

तौक्‍ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती तालुकास्तरावरून मागविण्यात येत आहे. सद्यःस्थितीत घाटमाथा परिसरामध्ये पाऊस पडत असल्याने काही भागातील नुकसानाची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार मुळशी-75, भोर-9, मावळ-10, खेड-96 आणि आंबेगावमधील एका घराचे नुकसान झाले आहे. शिरूरमधील एका घराची पडझड झाल्याने दोन व्यक्ती या किरकोळ जखमी झाल्या.

प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. तर, खेडमधील एका जखमीला प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले. भोर तालुक्‍यातील 90 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले. मुळशी तालुक्‍यातील खांबोली गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे.

तसेच ताम्हिणी गावच्या ग्रामपंचायत कार्यालयाचे पत्रे उडाले आहेत. खेड तालुक्‍यातील दिवेगावातील एका प्राथमिक शाळेचे संपूर्ण नुकसान झाले आहे. तर दोन अंगणवाडीचे पत्रे उडून गेले आहेत. बारामती तालुक्‍यामध्ये विद्युतवाहिनीचा शॉक बसल्याने दोन शेळ्या व दोन मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मदतीसाठी खेड व आंबेगाव तालुक्‍यांमध्ये सात पथके पाठवण्यात आली आहे. यामध्ये एक पथक खेडमध्ये तर सहा पथके आंबेगाव तालुक्‍यात आहेत.

जिल्हाभर पाऊस
चक्रीवादळामुळे सोमवारी बहुतेक तालुक्‍यांत पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात सरासरी 71.14 मिमी इतक्‍या पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये वेल्हा तालुक्‍यात सर्वाधिक म्हणजे 20.25 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर हवेली-10.60, मुळशी-8.50, भोर-7.63, मावळ-6.91, जुन्नर-0.78, खेड-0.67, आंबेगाव-2.40, शिरूर-0.6 मिमी, बारामती-0.50, इंदापूर-0, दौंड-0.88 आणि पुरंदरमध्ये 5 मिमी इतक्‍या पावसाची नोंद झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.