पुणे – विद्यार्थ्यांच्या डोक्‍यावर “टांगती तलवार’; 498 वर्ग खोल्या धोकादायक

242 शाळांमधील 498 वर्ग खोल्या धोकादायक


सर्वेतून प्रकार समोर; संबंधित खोल्यांमध्ये वर्ग न भरवण्याच्या सूचना

पुणे – जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेनुसार जिल्ह्यातील 242 शाळांमधील 498 वर्ग खोल्या धोकादायक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या खोल्यांमध्ये शाळा भरवू नये, अशा सूचना संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. तसेच या शाळांतील विद्यार्थ्यांना तात्पुरते अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे यांनी दिली.

नारायणपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत घडलेल्या घटनेमध्ये चार मुले गंभीर जखमी झाले होते. या घटनेचे पडसाद सर्वसाधारण सभेत उमटले. सदस्यांनी शिक्षण विभागावर आरोप-प्रत्यारोपण सुरू झाले. त्यावेळी अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते आणि उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व धोकादायक शाळांची माहिती घेऊन आठ दिवसांत अहवाल सादर करावा, असे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना दिले आहे. दरम्यान, जिल्ह्यात 3 हजार 672 जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. त्यामध्ये 242 शाळांमधील 498 वर्ग खोल्या धोकादायक असून, त्या वापरण्यास अयोग्य असल्याचे शिक्षण विभागाने दिलेल्या अहवालातून स्पष्ट होते.

त्यामध्ये जुन्नर, दौंड, हवेली, मावळ आणि आंबेगाव या तालुक्‍यांतील धोकादायक वर्ग खोल्यांची संख्या अधिक आहे. या खोल्या पाडण्याशिवाय अन्य पर्याय नाही. त्यामुळे या शाळा पाडून नव्याने उभारण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे सर्वशिक्षा अभियानांतर्गत निधी मिळण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषदेचा निधीच्या माध्यमातून या शाळा बांधण्यात येणार असून, त्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील तालुकानिहाय धोकादायक शाळांची संख्या आणि कंसात धोकादायक वर्ग खोल्यांची संख्या
आंबेगाव – 23 (46 वर्ग खोल्या), बारामती – 8 (16 वर्ग खोल्या), भोर – 16 (29 वर्ग खोल्या), दौंड – 23 (57 वर्ग खोल्या), हवेली – 18 (57 वर्ग खोल्या), इंदापूर – 19 (30 वर्ग खोल्या), जुन्नर – 27 (64 वर्ग खोल्या), खेड – 25 (52 वर्ग खोल्या), मावळ – 21 (50 वर्ग खोल्या), मुळशी – 13 (21 वर्ग खोल्या), पुरंदर – 12 (26 वर्ग खोल्या), शिरूर – 7 (20 वर्ग खोल्या), वेल्हे – 30 (30 वर्ग खोल्या).

Leave A Reply

Your email address will not be published.