पुणे – 49 तृतीयपंथी देणार “सेट’

पुणे – सहायक प्राध्यापकांसाठी अनिवार्य असलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात “सेट’ येत्या दि.23 जून होत आहे. यासाठी महाराष्ट्र व गोवा राज्यांतून तब्बल 1 लाख 2 हजार 573 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यंदा अर्ज भरताना ट्रान्सजेंडर अर्थात तृतीयपंथी हा पर्याय उपलब्ध होता. त्यानुसार यावर्षी प्रथमच 49 ट्रान्सजेंडर उमेदवार “सेट’ परीक्षेला बसणार आहेत, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या “सेट’ विभागाकडून देण्यात आली.

पुणे विद्यापीठामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यात “सेट’ घेतली जाते. यासाठी दि. 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. तर दि.6 मार्चपर्यंत अर्जात दुरुस्तीसाठी कालावधी देण्यात आला होता. त्यानंतर आजअखेर 1 लाख 2 हजार 573 उमेदवारांनी “सेट’साठी अर्ज केले आहेत. त्यातील पुरुष उमेदवारांची संख्या 45 हजार 111, तर महिला उमेदवारांची संख्या 57 हजार 414 इतकी आहे. यावर्षी पहिल्यांदाच “ट्रान्सजेंडर’ म्हणून 49 उमेदवारांनी “सेट’साठी अर्ज केले आहेत.

यापूर्वी “सेट’ दि.28 जानेवारी 2018 रोजी झाली होती. त्यानंतर आता दीड वर्षांनी ही परीक्षा होत आहे. त्यामुळे यंदा उमेदवारांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. सेटच्या 2018 च्या परीक्षेसाठी 78 हजार 310 उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी 62 हजार 404 उमेदवारांनी “सेट’ दिली. त्यापूर्वी झालेल्या दि.16 एप्रिल 2017 च्या “सेट’साठी 85 हजार 509 उमेदवारांनी अर्ज केले. त्यापैकी 70 हजार 101 उमेदवारांनी प्रत्यक्ष “सेट’ दिल्याची माहिती देण्यात आली.

यासंदर्भात “सेट’ विभागाचे समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस म्हणाले, “यावर्षी सेट परीक्षेसाठी अपेक्षेपेक्षा अधिक संख्येने अर्ज आले आहेत. गेल्या वर्षी विद्यापीठ अनुदान आयोगाने “सेट’ आणि अभ्यासक्रमचा “पॅटर्न’ बदललेला आहे. त्यात आता तीनऐवजी दोन पेपर, अभ्यासक्रमात बदल, परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिका व कालावधी यात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे पेपर सेटिंगपासून सर्व प्रक्रिया नव्याने करावी लागली. त्यामुळे या परीक्षेस उशीर झाला. मात्र या सेट परीक्षेची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.